किडनी स्टोन: ब्रेक द सायकल

Dr. Suraj Bhondave

किडनी स्टोन या आजाराची आजीवन व्याप्ती १% ते १५% इतकी आहे. हा आजार माणसाचे कुळ, वय, लिंग व भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून आहे. प्रौढ पुरुषांमध्ये किडनी स्टोनचे प्रमाण २ ते ३ पटींनी महिलांपेक्षा जास्त आहे, परंतु जंतुसंसर्ग मुतखड्याचे (स्त्रुविट स्टोन्स) प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे, ते २:१ इतके आहे. साधारणपणे ४० ते ६० वयामध्ये किडनी स्टोन होण्याचे प्रमाण सर्वात जास्त असते. वजन, बॉडी मास इंडेक्स, मधुमेय, ह्रदयरोग आणि चयापचय सिन्ड्रोम यांचा संबंध किडनी स्टोनच्या धोक्याशी आहे. सायट्रेट हा कॅल्शिअम ऑक्झलेट आणि कॅल्शिअम फॉस्फेट या मुतखड्यांचा अवरोधक आहे. किडनी स्टोनच्या पेशंटमध्ये अचानकपणे उजव्या किंवा डाव्या बाजूला पोटात दुखणे, मळमळ किंवा उलटी होणे अशी लक्षणे दिसतात. लघवीची तपासणी, पोटाची सोनोग्राफी, पोटाचा एक्स रे व गरज पडल्यास सी टी स्कॅन द्वारे आपल्याला किडनी स्टोन च्या योग्य निदानापर्यंत पोहचता येईल.

किडनी स्टोनच्या पेशंटला तज्ञ डॉक्टरांनी किंवा युरोलॉजिस्ट यांनी जे उपचार सांगितले आहेत त्या व्यतिरिक्त खालील काही सूचना वजा शिफारसी पाळल्या, तर आपल्याला किडनी स्टोन पुन्हा होण्याची शक्यता नक्कीच कमी होईल.

  • लघवीचे प्रमाण २५०० मिली प्रतिदिन किंवा त्यापेक्षा जास्त राहण्यासाठी द्रवपदार्थांचे सेवन (पाणी, फळांचे रस, इ.) हे कमीतकमी ३००० मिली प्रतिदिन असावे. यामुळे २ फायदे होतात- लघवीचे प्रमाण वाढते, त्यामुळे लघवी स्थिर राहत नाही, मुतखड्याच्या घटकांचे सुपरसाच्युरेशन बदलवते व पुन्हा किडनी स्टोन होण्याचे प्रमाण कमी होते.
  • वैद्यकीय शास्त्रानुसार, जड पाण्यामुळे किडनी स्टोन होतात हे किरकोळ चिंतेचे कारण असून त्याचा फार संबंध लावू नये.
  • प्रमाणित कार्बोनेटेड पेय पुन्हा किडनी स्टोन होण्यापासून संरक्षण करतात. मुख्यतः लिंबूवर्गीय (सायट्रेट) सोडा (संत्री/ लिंबू फ्लेवर) यामध्ये सायट्रेट चे प्रमाण जास्त असते व पुन्हा किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी करतात.
  • अलीकडच्या नवीन संशोधनानुसार कॉफीच्या (चहाच्या पानात किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य) सेवनामुळे कॅल्शिअम रहित किडनी स्टोन होण्याचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे ते टाळलेले उत्तम. लिंबूवर्गीय रस जसे की संत्री किंवा लिंबाचा रस योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे लघवीचे प्रमाण व त्यामध्ये सायट्रेट चे उत्सर्जन होऊन स्टोन पेशंटला फायदा होण्यास मदत होते.
  • महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांमध्ये मांसाहारी पदार्थांचे जास्त सेवन असते, त्या लोकांमध्ये किडनी स्टोन होण्याचे प्रमाण ही जास्त आहे. अशा लोकांमध्ये कॅल्शिअम, युरिक असिड आणि ऑक्झलेट स्टोन होण्याचे प्रमाण अधिक तीव्र बनते. उल्लेखनीय बाब म्हणजे, मांसाहारी पदार्थ सेवन करणाऱ्यांपेक्षा फळे व भाजीपाला खाणाऱ्यांमध्ये पुन्हा किडनी स्टोन होण्याचे प्रमाण कित्येक पटींनी कमी आहे.
  • पुन्हा किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी मीठाचे सेवन प्रमाणात करावे. साधारणतः बेसल चयापचय आहारामध्ये मीठाचे प्रमाण ५० मिलिमोल प्रतिदिन इतके असावे.
  • किडनी स्टोन पेशंट मध्ये कॅल्शिअम सेवनाच्या संदर्भात बरेच संभ्रम आहेत. जुन्या शिफारशींनुसार या पेशंटला कॅल्शिअम चे सेवन लक्षणीयरित्या मर्यादित ठेवण्यास सांगितले होते. पण नवीन संशोधनानुसार मध्यम स्वरूपात कॅल्शिअम सेवन हे उपयुक्त ठरत आहे. वयोवृद्ध लोकांमध्ये, ज्यांना किडनी स्टोन बरोबरच गुडघेदुखी व सांदेदुखी चा त्रास आहे, त्यांनी कॅल्शिअम सप्लिमेंट्स (कॅल्शिअम सायट्रेट स्वरूपात) घेण्यास काही हरकत नाही. डॉक्टरांनी ही त्या लिहून देण्यास मनामध्ये काहीही शंका बाळगू नये.
  • पेशंटनी व्हिटॅमिन सी चे ही प्रमाण सेवनामध्ये २ ग्रॅम प्रतिदिन इतके मर्यादित ठेवावे.

वरील सर्व गोष्टींचे तंतोतंत पालन केल्यास, जसे की मांसाहार, मीठाचे सेवन मर्यादित ठेवणे, मध्यम स्वरूपात कॅल्शिअम घेणे, जास्त फळे व भाजीपाला खाल्यामुळे आपण नक्कीच पुन्हा किडनी स्टोन होण्याचे प्रमाण ५०% कमी करू शकतो.

डॉ. भोंडवे सुरज तुकाराम
एम.एस. (जन. सर्जन), डी.एन.बी (युरोलॉजिस्ट), पुणे